आहार-व्यायाम आरोग्याची गुरुकिल्ली

शरीर हे आरोग्यपूर्ण असावे, निरोगी असावे यासाठी हजारो वर्षापासून प्रयत्न सुरु आहेत. आपण ज्या सृष्टीत राहतो, त्या सृष्टीशी साम्य राखून आरोग्यप्राप्ती करणे सहज शक्य आहे. आजकाल प्रत्येकाच्या घरात वाटर प्युरिफायर आलेले आहेत. किमान वॉटर फिल्टर तरी प्रत्येकाकडे असते. पूर्वीच्या काळी मात्र घरोघरी माठ असायचा आणि तो माठ ठेवण्यासाठी तिवई असायची. या तीन पाण्याच्या तिवईवर पूर्ण माठाचा भर तोललेला असायचा.

याप्रमाणेच हा शरीररूपी माठ ज्या तीन पायांच्या तिवईवर तोललेला आहे. हे साहाय्यक पाय म्हणजे आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य होय. यावरच सर्व शरीरक्रिया, आरोग्य अवलंबून आहे. अन्न हे प्राणधारण करणाऱ्यांचा प्राण आहे. म्हणून या सृष्टीतील सर्व सजीव अन्नामागे धावत असतात. शरीराचे बळ, वर्ण, पुष्टी, बुद्धी आणि सुख अन्नावरच अवलंबून आहे.

या अन्नावरच सगळे जीवन अवलंबून आहे. म्हणून आहारात काय घ्यावे? कसे घ्यावे? किती घ्यावे? या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. सगळ्यांनी असा आहार सेवन करायला हवा की जे शरीराचे स्वास्थ्य टिकवून ठेवेल आणि रोग उत्पन्न होऊ देणार नाहीत. गरम, स्निग्ध, योग्य मात्रेत, पहिले अन्न पचल्यावर, मनाला आवडेल अशा ठिकाणी सर्व योग्य सामग्रीसह, फार भरभर नाही आणि हळूही नाही, असे न हसता बोलता, जेवणाकडे पूर्ण लक्ष देऊन अन्न घ्यावे.

आजकाल धावपळीच्या जगात तसेच नोकऱ्यांमध्ये बदलत्या पाळ्यांमध्ये काम करावे लागते. त्यामुळे जेवणाच्या वेळाही वारंवार बदलतात. निद्रा, झोप ही शरीराचे धारण-पोषण करणारी आहेत. योग्य प्रमाणात निद्रा घेतली तर ती शरीरासाठी आवश्यक आहे.

हल्लीच्या लोकांचा वाढता कल फास्टफूड खाण्याकडे आहे. फास्टफूड खाल्याने उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोगाचे विराट, अतिवजन वाढणे, किडनीवर परिणाम होणे असे आजार उद्भवतात. हॉटेलमधील खाण्याने जुलाब, उलट्या, टायफाईड, कावीळ, कॉलरा, अन्नातून विषबाधा, पोटदुखी आदी विकार जडतात. हॉटेलमधील पदार्थांचा दर्जा तेथे असलेली अस्वच्छता याचादेखील विचार करणे महत्त्वाचे आहे.

रोजच्या आहारात किमान ४ ते ५ थेंब गायीचे तूप वापरले पाहिजे. रोज किमान एक ग्लास दुध पिले पाहिजे, त्यातून प्रथिने मिळण्यास मदत होते. दिवसातून चार वेळा आहार घेणे महत्त्वाचे असून यामध्ये दोन वेळा नाश्ता व दोन वेळा जेवण यांचा समावेश होतो.

नाष्ट्यामध्ये दुध, फळ, मोड आलेली कडधान्ये, गुळ-शेंगदाण्याचे लाडू आदींचा समावेश असावा तर जेवणामध्ये समतोल आहार म्हणजेच वरणभात, भाजीपोळी, आमटी, ताक यांचा समावेश असावा. जेवणापूर्वी सलाड ANआणि जेवताना कोशिंबीरीचादेखील वापर असावा.

पूर्वी घरे शेणाने सारवली जायची. आजकाल टाईल्सचा सर्वात जास्त वापर केला जातो. त्यामुळे सांधेदुखीचे आजार आपण पाठीमागे लावून घेतो. जेवण झाल्यानंतर किमान एक तास तरी झोपू नये. आहारासोबत विहार महत्त्वाचा असल्याने व्यायामाला देखील तेवढेच महत्त्व आहे. म्हणून किमान ४० मिनिटे चालणे, योगासने, सायकलिंग तसेच डॉक्टरच्या सल्ल्याप्रमाणे व्यायाम करणे गरजेचे आहे. सर्व सजीवसृष्टीला चांगले आरोग्य लाभो, ही धन्वंतरी चरणी प्रार्थना.

प्रतिक्रिया व्यक्त करा