कबड्डी

हमामा, हुंबरी, हुतुतू या नावानी ओळखला जाणार खेळ म्हणजे कबड्डी. पूर्वी हा खेळ नियमांचे कोणतेही बंधन न पाळता खेळला जात. महाराष्ट्रात पुण्याच्या ‘डेक्कन जिमखाना’ या संस्थेने १९१५-१९१६ साली सगळ्यात आधी या खेळाचे नियम तयार करून त्याच्यात सुसूत्रता आणली. १९३३ साली अखिल महाराष्ट्र शारीरिक शिक्षण मंडळाने भारतीय खेळांचा प्रसार करावयाच्या धोरणानुसार या खेळात प्रथम नियमबद्धता आणि आकर्षकपणा उत्पन्न केला. भारतीय ऑलिंपिक क्रीडा सामन्यांच्या समितीने १९५८ पासून कबड्डीला मान्यता दिलेली आहे, तसेच खेळाच्या स्वरूपात थोडे बदल करून त्याला ‘कबड्डी’ नाव अधिकृत म्हणून संमत केले आहे.
महाराष्ट्रातला कबड्डी हा खेळ बंगालमध्ये ‘हुडू’, दक्षिण भारतात ‘चेडुगुडु’ व उत्तर भारतात ‘कबड्डी’ या नावांनी परिचित आहे.. कबड्डी खेळाचे स्वरूप म्हणजे प्रत्येक संघात नऊ गडी व साधारण १५ मिनिटांचे तीन डाव. प्रत्येक डाव संपल्यानंतर पाच मिनिटे विश्रांती. संघाला गुण देतांना एका डाव संपल्यावर दोन्ही संघात जितके गडी नाबाद असतील, त्यांचे प्रत्येकी दोन गुण या पध्दतीने गुण दिले जातात. मैदानाच्या मध्यरेषेवर एक आणि दोन निदान रेषांवर एकेक असे तीन पंच असतात. एका संघाचे सर्व गडी बाद झाल्यावर ‘लोण’ होते आणि विरुद्ध संघाला जास्त गुण मिळतात.
परस्पर विरोधी संघातील गडी आलटून पालटून श्वास रोखून विशिष्ट शब्दोच्चार करीत विरुद्ध संघाच्या क्षेत्रात चढाई करून प्रतिस्पर्ध्यांना हाताने किंवा पायाने स्पर्श करून त्यांना बाद करण्याचा प्रयत्न करतात तर विरुध्द संघ पकडण्याचा प्रयत्न करून मध्यरेषेला स्पर्श करावयास प्रतिबंध करत रहातो. दम रेखून खेळायचे आणि पकडले गेल्यास सर्व खेळाडू बाद अशा नव्या नियमांमुळे हा खेळ रंजक तर बनला आहेच, पण शिस्तसह वैयक्तिक व सांघिक कौशल्यालाही वाव मिळाला आहे.