खेळांचे विश्व

मनोरंजनासाठी किंवा शारीरिक व्यायामासाठी खेळ खेळणे ही माणसाची नैसर्गिक प्रवृत्ती आहे. अगदी लहानांपासून वृद्धापर्यंत सर्वांनाच खेळायला आवडते. काळानुसार खेळाच्या पद्धती बदलत असल्यातरी मानवाच्या अगदी प्राथमिक अवस्थेपासून खेळ खेळले जात असल्याचे पुरावे आहेत. प्राचीन वैदिक काल, रामायण, महाभारत याकाळांची माहिती घेतली तर द्युत, फासे, कुस्ती, घोड्यांच्या शर्यती आदी खेळांची वर्णने वाचायला मिळतात. केवळ भारतातच नव्हे तर ईजिप्त, चीन, जपान आदी देशांतही सोंगट्या, गंजीफा, बुद्धिबळे, शतरंज यांसारखे खेळ फार प्राचीन काळापासून खेळले जात असल्याचे संदर्भ सापडतात.

मानवी जीवनात खेळांना महत्त्वाचे स्थान आहे कारण,

  •  खेळ आयुष्यातील व्यथा व चिंता विसरण्यासाठी मदत करतात, मनाला विरंगुळा देतात.
  •  शरीर व मन ताजेतवाने करण्याचे काम खेळ करतात.
  •  शारीरिक श्रमांच्या खेळांत शरीराचा व्यायाम होतो.
  •  शरीर काटक व बळकट बनते.
  •  खेळांमुळे मनोधैर्य, चिकाटी, खिलाडू वृत्ती, निर्णयक्षमता अशा गुणात वाढ होते.
  •  खेळ सहकार्याची वृत्ती वाढवितात. संघभावना व नेतृत्वगुणांना वाव देतात.
  •  खेळातील चढाओढीमुळे खेळांचा दर्जाही वाढतो.
  •  राष्ट्राराष्ट्रांतील क्रीडास्पर्धांमुळे आंतरराष्ट्रीय सामंजस्य वाढीला लागते.

वेगवेगळ्या पातळ्या आणि पैलूचा विचार करून खेळांचे वेगवेगळ्या प्रकारात वर्गीकरण करता येते. जसे- बैठे खेळ व मैदानी खेळ.

पत्त्यांचे खेळ, बुद्धिबळे, गंजीफा, सोंगट्या, फाशांचे खेळ, कॅरम हे बैठे खेळ घरात बसून खेळले जातात. मैदानी खेळांचा विचार करता लहान मैदानात म्हणजे बंदिस्त जागा व आखलेल्या क्रीडांगणात खेळता येतील असे बॅडमिंटन, टेबल टेनिस, रिंग टेनिस, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल यांसारखे विदेशी खेळ तर खोखो, कबड्डी, आट्यापाट्या, लंगडी असे देशी खेळांचा सामावेश होतो. हे खेळ कोर्ट गेम म्हणूनही परिचित आहेत. ज्या खेळांना मोठी मैदाने लागतात त्यांत क्रिकेट, फुटबॉल, हॉकी, पोलो, बेसबॉल, गोल्फ हे विदेशी खेळ मोडतात. खेळांमध्ये शर्यतींचे खेळ जसे- धावणे, गोळाफेक, थाळीफेक, उड्यांचे सर्व प्रकार, अडथळ्यांच्या शर्यती यांचा समावेश होतो.

मैदानापासून पाण्यातील, बर्फातील खेळांचे प्रकारही पहायला मिळतात. द्वंद्वात्मक खेळात कुस्त्या, मुष्टीयुद्ध तर शारीरिक कसरतीच्या खेळांत मल्लखांब, आडवा दंड, टांगत्या कड्या अशा साधनाचा आधार घेऊन शारीरिक कसरती केल्या जातात. साहसी व रोमांचकारी खेळांच्या विश्वाने माणसाच्या धाडसी प्रवृत्तीला आव्हान दिले आहे. ते पुरे करण्याचे आव्हान पेलतांना खेळाडू आणि खेळ पहाणारे साऱ्यांचे जग आनंदाने भरून गेले आहे, हे नक्की.

प्रतिक्रिया व्यक्त करा