लंगडी

लंगडी हा महाराष्ट्रातील मुलामुलींचा आवडता खेळ आहे. कबड्डी, खो-खो खेळाप्रमाणे हा एक स्पर्श खेळ मानावा लागेल. लंगडी हा एक भारतीय मैदानी खेळ आहे. या खेळामध्ये लंगडी घालणाऱ्याने धावणाऱ्याला केलेला स्पर्श ठरवून संबंधित खेळाडूस बाद दिले जाते. लंगडी हा एक आदर्श खेळ आहे. लंगडी खेळातून काही मुलभूत कौशल्याचा विकास होतो व सहजप्रवृत्तीचे उदात्तीकरण होते. एका पायावर तोल सांभाळणे व झेप टाकणे यामुळे पायातील ताकद वाढते.

धावणे, हुलकावणी देणे, दिशा बदलणे यामुळे धावणारा खेळाडू चपळ बनतो. मज्जासंस्था व स्नायूसंस्था यांचा समन्वय वाढतो आणि दम, कस व चिकाटी या गुणांचा विकास होतो. विशिष्ट मैदानावर काही खेळाडूंनी धावत फिरणे व एकाने आपल्या एका पायावर तोल सावरत, दुसरा पाय मागे उचलून, पाळणाऱ्यांचा पाठलाग करून त्याला स्पर्श करणे; तर पाळणाऱ्याने हुलकावण्या देत आपण बाद होणार नाही असा प्रयत्न करणे, हे या खेळाचे स्वरूप आहे.

थोडक्यात लंगडी घालून शिवाशिवी खेळणे असा साधा खेळ असून तो मुलभूत मानवी हालचालींवर असल्याने जगात बहुतेक सर्वत्र खेळला जातो. खेळ म्हणजे मानवी संस्कृतीचा उत्तम आविष्कार, हे तत्त्व या खेळातून प्रत्ययास येते.

नेहमी आपण दोन पायांवर उभे राहतो. एक-एक पाऊल कमी जास्त वेगाने टाकत चालतो किंवा पळतो. पण लंगडी एका (डाव्या अगर उजव्या) पायावर घालावयाची असते. ९० टक्के मुले डाव्या तर १० टक्के उजव्या पायावर लंगडी घालतात. धावणे नैसर्गिक तर लंगडी कृत्रिम आहे. म्हणून मर्यादित क्रीडांगणात हा सामना होतो. लंगडी घालणारा एक असतो, तर त्याला चुकविणारा अनेक असतात. तेव्हा लंगडी घालणाऱ्या एकेक गड्यास बाद करावे. त्यासाठी कमकुवत प्रतिस्पर्ध्यांची निवड करून एका पायावर उभे राहून त्याचा पायावर उड्या मारीत पुढे अगर बाजूला जाणे म्हणजे लंगडी घालणे होय.

९ ते १३ वर्षे वयोगटातील मुले-मुली या खेळात उत्साहाने भाग घेतात. यासाठी अवांतर, खर्चिक साहित्य लागत नाहीत. फक्त छोटे क्रीडांगण लागते. मात्र ते सपाट व चांगले असावे. लंगडी खेळण्यासाठी ९ राखीव किंवा ३ राखीव गडी असतात. यासाठी प्रत्येकी ५ ते ६ मिनिटांचे ४ डाव होतात.

या खेळाचे काही नियम आहेत जसे फक्त हातानेच गडी बाद करावा लागतो. लंगडी घालणाराचा हात अथवा पाय जमिनीस टेकल्यास लंगडी घालणारा बाद होतो. धावणाऱ्याने लंगडी घालणाऱ्याला स्पर्श केला तसेच धावणारा मैदानाबाहेर गेला तर तो बाद होतो. जास्त गुण मिळविणारा संघ विजयी होतो.

प्रतिक्रिया व्यक्त करा