हॉकी

सर्वदूर पोहचलेल हॉकी खेळ भारताचा हा राष्ट्रीय खेळ. भारतीय हॉकी विश्वातील जादुगार मेजर ध्यानचंद यांच्या कारकिर्दीत हा खेळ अफाट गाजविला. हॉकी खेळाची सुरुवात साधारणपणे इसवी सन पूर्व २००० च्या दरम्यान पर्सियामध्ये झाली असल्याचे पुरावे मिळतात. इतिहासाची पाने उलगडल्यास प्राचीन काळी ग्रीक लोक हा खेळ खेळत असत असा उल्लेख आहे.

हॉकीच्या इतिहासातील महत्त्वाचे टप्पे

  • ब्लॅक हेथ  नावाने पहिला हॉकी क्लब स्थापन करण्यात आला.
  • सुरवातीच्या काळात विंबल्डन हॉकी क्लबतर्फे या खेळाचे नियम तयार केले गेले. त्यानंतर १८८६ साली हॉकी असोसिएशन तर्फे हॉकीचे नियम तयार केले गेले.
  • १८९५ साली इंग्लंड आणि आयर्लंड या दोन देशांदरम्यान पहिला आंतरराष्ट्रीय हॉकी सामना खेळला गेला.
  • १९०८ साली ऑलिंपिकमध्ये पहिल्यांदा हॉकीचा सामना खेळला गेला.

हॉकी मैदानाची रचना – ९० मीटर्स लांब आणि ५५ मीटर्स रुंद मैदानात हॉकी खेळला जातो. साधारण १५६ ग्रॅम ते १६३ ग्रॅम वजनाचा बॉल आणि हॉकी स्टीक यांच्या साहाय्याने हा  खेळ रंगत जातो. यातील स्टीक ही डाव्या बाजूने सपाट असते. परस्पर विरोधी संघातील एक एक खेळाडू हॉकीचा सामना सुरू करण्यापूर्वी आपापली हॉकीस्टीक जमिनीवर व एकमेकांच्या हॉकीस्टीकवर आदळतात आणि खेळ सुरू होतो.

हॉकी मैदानाचे विभाजन तीन ठळक भागातून लक्षात येते. संपूर्ण मैदानाचे दोन समान भाग करणाऱया आणि गोल लाईनला समांतर जाणाऱ्या मध्यभागातील रेषेला फिफ्टी यार्ड-लाईन किंवा सेंटर लाईन म्हणतात. मैदानाच्या रुंदीकडील भागाला जोडणाऱ्या रेषेला ‘गोल लाईन’ म्हणतात. हे भाग म्हणजे बचाव, मध्य व आक्रमण विभाग होय.

खेळ सुरू करण्यासाठी खेळाडू त्याच्या टीमच्या दिशेने बॉल फेकतो. याला पास बॅक म्हणतात. कॅरी, कॉर्नर, ड्रिबल, हॅट-ट्रीक, साइड लाईन, स्ट्रायकिंग, सर्कल या काही संज्ञा हॉकीशी निगडीत आहेत.

हॉकीचा खेळ जसा जमिनीवर खेळला जातो तसाच तो बर्फातही खेळला जातो. मात्र बर्फातील हॉकीचे मैदान जरासे भिन्न स्वरूपाचे असते. त्याची लांबी साधारणपणे ५६ ते ६१ मीटर व रूंदी २६ ते ३० मीटर असते. त्याच्या चारी बाजूला १.०६ ते १.२२ मीटर. उंचीच्या लाकडी फळ्या असतात. या खेळात चेंडूऐवजी भरीव रबरी कडे वापरतात. जे ‘पक’ म्हणून ओळखले जाते. पायात स्केट घालून वेगाची परिसीमा गाठत हा खेळ खेळला जातो. हॉकी बर्फातील असो की जमिनीवर विलक्षण गतीने चढाओढीने हा खेळ रंगत जातो. मैदानातील दोन्ही टोकांना असलेल्या जाळीत चेंडू टोलविण्याचा प्रयत्न आणि गोलरक्षाची गोल अडविण्याची धडपड विलक्षण असते.

जगभरातील विविध देश व क्रीडा संघटना हॉकी खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी  निरनिराळ्या स्पर्धा आयोजित करून बक्षिस वितरण करतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर वर्ल्डकप, युरोपियन वुमन्स हॉकी कप यासारखे पुरस्कार दिले जातात, तर राष्ट्रीय स्तरावर गंगोत्रीदेवी वुमन्स हॉकी फेडरेशन कप, रंगास्वामी कप, बॉम्बे गोल्ड कप, नेहरु गोल्ड कप असे अनेक पुरस्कार हॉकीसाठी दिले जातात.

प्रतिक्रिया व्यक्त करा